या जिल्ह्यावर पूर्वी मौर्य, सातवाहन यांच्यानंतर काही शतके मुस्लीम राज्यकर्त्यांनीही राज्य केले. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी सातारा आपल्या ताब्यात घेतला. राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने घेतलेला सातारा परशुराम पंतप्रतिनिधींनी पुन्हा मिळविला. इ. स. १६९८ साली छत्रपती राजारामांनी साताऱ्याला राजगादीची स्थापना केली. राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी साताऱ्यातून छत्रपतींची गादी सांभाळली. पुढे औरंगजेबाने शाहुंची सुटका केल्यानंतर साताऱ्यावर शाहुंच्या पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. ताराबाईंनी कोल्हापुरात स्वतंत्र गादी स्थापन केली. मराठा काळात सातारा प्रदेशात मोठे सरदार उदयास आले होते. यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे, मलवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, कापशीचे घोरपडे इत्यादी प्रमुख होते. इंग्रज कालखंडात साताऱ्याच्या गादीच्या संरक्षणासाठी रंगो बापूजी इंग्लंडमध्ये गेले.
इ. स. १८४९ साली दत्तक विधान नामंजूर करीत इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले. रंगो बापुजींनी १९५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा दिला व ते कधीही इंग्रजांच्या हाती आले नाहीत. छोडो भारत चळवळीत जिल्ह्याचे मोठे योगदान होते. क्रांतीसिंह नाना पाटलांचे प्रतिसरकार येथेच स्थापन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्हा दक्षिणेकडील वारणा नदीपासून ते उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत पसरला होता.
स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय कामकाज आणि सोयीच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा तयार झाला तर उत्तर सातारा जिल्ह्यातून सध्याचा सातारा जिल्हा उदयास आला. सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा म्हटले जाते. आजही सेना दलात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान देशाच्या सीमेवर देशाची सेवा बजावित आहेत. सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना २३, जून १९६१ मध्ये करण्यात आली.